Monday, 11 May 2015

कर्नाटक दर्शन!

गेल्या आठवड्यात मी पर्यटनास कर्नाटकात जाऊन आलो.  कामाच्या धामधुमीतून वेळ काढून मनोरंजन करायचे व मित्राला दिलेला शब्द पाळायचा असे ठरवून प्रवासाला लागलो . हा प्रवास मला केवळ माझ्या मनाला उल्हसित करणारा ठरणारा नसून तर माझ्या समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन  बदलणारा ठरेल असे कधीच ध्यानी आले नाही .

फिरायला गेलेलो असताना अशी काही दृश्ये बघितली ज्यांनी माझ्या मनात आपल्या संस्कृतीबद्दलच नव्हे, तर त्याशी निगडीत भारतीय अभियांत्रिकी, शिल्पकला, तत्त्वज्ञाना बद्दल आदरभावना उत्पन्न झाली . बऱ्याच ठिकाणी  असे आढळते की, नास्तिक किंवा कर्मकांडात न मानणाऱ्या लोकांत पाश्चिमात्य संस्कृती बद्दल जिव्हाळा व स्वतःच्या संस्कृती बद्दल लज्जाच असते. मी ही त्यांच्यापैकीच होतो हे म्हणणे फारसे वावगे ठरणार नाही .

या गेल्या आठवड्यात मी चालुक्य व विजयनगर कालीन अवशेष बघितले . चालुक्य हे ५,६,व ७व्या शतकात बादामी, पत्तद्कल व ऐहोळे या शहरात मुख्यतः राज्य करून गेले. बादामी पासून एक १५० कि मि दूर हंपे (हाच बरोबर उच्चार) येथे विजयनगर शहराची स्थापना तुंगभद्रा नदीच्या तिरी १५व्या शतकात केली गेली . मधल्या काळात उत्तर कर्नाटकावर देवगिरी चे यादव , पल्लव, बह्मानी सल्तनत यांनी राज्य केले. परंतु उत्तर कर्नाटकातल्या भूमीतून तयार झालेली ही दोनच महान राज्ये.

बादामी गावामध्ये स्थित अगडबंब तांबूसरंगाच्या डोंगरामध्ये चालुक्य ४ अप्रतिम कोरलेल्या गुंफा सोडून गेले. या सर्व गुंफा शैव व वैष्णव दोन्ही पंथांना समर्पित अहेत. शंकर-पार्वती, श्रीगणेश,कार्तिकेय यांचा विविध मुर्त्या तर आहेतच, बरोबरीने विष्णू चे दशावतार देखील सुशोभित केले आहेत. त्याच बरोबरीने अनेक इतर देव देवता, पुराणांमधील इतर पात्रे उदा. नारद, शेषनाग, गंधर्व, कुबेर, नंदी, गरुड, हे सगळे एका ठिकाणी बघायला मिळतात . ही देवांची यादी वाचताना कुणास वाटेल, 'यात काय नवल?'. आजकालच्या भव्य दिव्य मंदिरांमध्ये ही हे सगळे बघायला मिळते! तर यावर मी असेच म्हणीन: काय प्रदर्शित केले आहे हे जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षा ते कशा प्रकारे प्रदर्शित केले आहे हे बघण्यात खरी मेख आहे .

शिल्पकारांनी ज्या प्रकारची वस्त्रे त्या देवांना नेसवली आहेत, त्यांच्या मुद्रा कशा आहेत, हे लक्ष्य देऊन बघण्यासारखे आहे . शिव-पार्वती, लक्ष्मी-नृसिंह आपल्याला एक मेकांच्या मांडीवर बसलेले, आलिंगन घातलेले दिसतात . एक मेकां प्रति प्रेम व्यक्त करताना त्यांना अभिमान वाटायचा, लज्जा नव्हे . आपल्या कडच्या 'valentine' दिनाची विल्लेवाट लावणाऱ्या स्वसंस्थापित धर्मरक्षकांनी ह्या गुंफा जरूर बघाव्यात . तसेच कोरलेल्या मूर्त्यांमध्ये जितक्या स्त्रिया आहेत, त्या सगळ्या जानव घातलेल्या दिसतात. हे बघून असे आपण निश्चितच समजू शकतो की, उपनयन किंवा मुंज ही फक्त ब्राह्मण पुरुषांमध्येच नाही, तर अखंड समाजात स्त्रियांसह सगळ्यांसाठी होती . ठिकठिकाणी आपल्याला 'अर्धनारीनटेश्वर' ही देवता बघायला मिळते . या देवतेची प्रतिमा तर डोळे घालून बघण्या सारखी आहे . शरीर कपाळा पासून जांघा पर्यंत दोन भागात विभागलेले दिसते . एका बाजुला शंकर तर दुसर्या पार्वती, असे एकत्र येउन बनलेले अद्वैत असे दैवत. याचा अर्थ चालुक्य समाज स्त्री-पुरुषांना समान मानायचा . स्त्रियांना कमी लेखणार्यांना हे दृश्य नक्की जागे करेल .

तसेच विजयनगर, हे हंपे गावाजवळचे अद्भुत असे स्थान .विजयनगर ही कृष्णदेवराय, या थोर राजाची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. ४० चौरस मैल एवढ्या अफाट मोठ्या आवारात हे शहर होते व सुमारे २०० वर्षे ते जगप्रसिद्ध होते . इकडच्या शिल्पाकामात आपल्याला चीनी, अरबी लोकांच्याही आकृत्या देखील दिसतात. याचा अर्थ, या आकृत्या आपल्या शिल्पकामात समाविष्ट करून घेणारे विजयनगर चे राज्यकर्ते इतर सौंसकृतींप्रति सहिष्णुता बाळगणारे होते. विजयनगरातील दोन विशेष बघण्यासारख्या गोष्टी म्हणायच्या तर विठ्ठल मंदिर व वीरुपाक्ष मंदिर. हे विठ्ठल मंदिर अत्यंत देखणे आहे व त्याचे फोटो अथवा पोस्ट कार्ड सर्वत्र पसरल्यामुळे ते अनेकांना माहित असते. मंदिराच्या बांधकामाचा आवाका लक्षात घेता आपल्याला कृष्णदेवरायाची विठ्ठलभक्ती कळते. असे सांगितले जाते की, आज महाराष्ट्रात पंढरपुरात ज्या विठ्ठल-रखुमाई च्या मूर्त्या विराजमान झालेल्या आहेत त्या इकडूनच स्थलांतरित झालेल्या आहेत. 'कानडावू विठ्ठलु' या अभंगाचा संदर्भ मला या ठिकाणी लागला. पुढे बघितले ते विरुपाक्ष मंदिर . मंदिराचे गोपुरम म्हणजेच प्रवेशद्वार हे कर्नाटकातील सर्वात उंच म्हणतात . या गोपुरावर आपल्याला असंख्य नग्न मूर्त्या व कामसूत्रातल्या 'पोझिशन' दिसतात. विजयनगर च्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण मंदिराचे प्रवेशद्वार कामसूत्राने सजवायचे ठरवले, यातच त्यांच्या विचारांची थोरवी लक्षात येते. आज राजा रवि वर्मा व एम एफ हुसेन यांच्या विरुद्ध 'धर्मरक्षक' आंदोलने करतात. टी व्ही वर 'आयटम सोन्ग' लागले कि दुतोंडी समाज त्याला बीभत्स म्हणतो. तोकडे कपडे घालणार्यांवर काही लोक 'पाश्चिमात्य' असल्याची टीका करतात.  

प्रवास झाल्या नंतर, हे सगळे अनुभव घेतल्या नंतर, समर्थ रामदास 'साधु हिंडता बरा' असे का म्हणतात हे प्रकर्षाने जाणवले. देश, समाज, संस्कृती या सर्वां बद्दलच्या माझ्या व्याख्या बदलल्या. शिवाय १४०० किलोमीटर Innova चालवण्याचा अनुभव तो वेगळाच. इडली, उत्तपा, भाकरी नी परिपूर्ण व माझा स्नेही- हेरंब उर्फ 'बसाप्पा' याच्या बरोबर झालेले माझे कर्नाटक दर्शन मनाला अतिशय अल्ल्हाददायक झाले.   

No comments:

Post a Comment