Monday, 22 May 2017

अच्छा, विश्वासआजो !

घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मतीमंद जे खेद मानी वियोगे : असे समर्थ जरी म्हणत असले, तरी आम्हा मतिमंदांस हा वियोग पचवणे मुळीच सोपे नाही. माझ्यासाठी माझा लाडका विश्वासआजो, माझ्या आईला जीवापाड आवडणारा तिचा विश्वासकाका आता या जगात नाही. आम्हा दोघांचे त्याच्यावर निरातिशय प्रेम होते... दर काही दिवसांनी त्याची भेट घेणे,  त्याचा आवाज ऐकणे हे माझ्यासाठी संजीवनीच असायचे. माझी आई, आजो, पणजीबाई या सगळ्यांचे प्रतिबिंब मला त्याच्यात दिसायचे. त्याचा आवाज, त्याचे मिश्कील हास्य आता माझ्या कानांवर कधीही पडणार नाही या कल्पनेनी मन व्याकूळ झाले आहे. माझ्या बालपणातले तीन ‘हिरो’ म्हणजे माझे आजो, पणजीबाई आणि विश्वासआजो हे तिघेही आता माझ्या अवतीभोवती नसतील…

आमच्या लहानपणातील आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. मला आठवतंय, आजोचे ते आम्हाला थम्स-अप पाजणे, आत्याआजीच्या कडेवर अंगणात फिरणे, विश्वासआजो च्या मोटर सायकल वरच्या अनेक अनेक चकरा, आणि पणजीबाईच्या मांडीवर लागलेली झोप... तेव्हा कर्वे रोडच्या घरासमोर बाग होती, त्यातल्या झोपाळा घसरगुंडीवर तासंतास हे सगळे मला आणि पार्थला खेळवत असत. आजो, आत्याआजी, विश्वासआजो, परीक्षितमामा यांच्याबरोबर चित्र रंगवणे आणि पझल सोडवणे हा माझा लाडका उद्योग. थोडे मोठे झाल्यावर विश्वासआजोनी माझी ओळख ओरिगामीशी करून दिली. टिळक स्मारकातील ओरिगामी  प्रदर्शनाची लहानपणी मी आतुरतेने वाट पाहायचो. एका कुठल्या तरी प्रदर्शनात १२ फुटी ‘ट्रोजन हॉर्स’ त्यानी बनविला होता, तेव्हा त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी त्याची थोडी मदत केली होती. त्या वेळी त्यानी माझ्या नकळत ‘सहाय्यक- ओम मराठे’ असे त्या पाटीवर लिहून टाकले. त्या प्रसंगी मला वाटलेला आनंद गगनापलीकडचा होता!

विश्वासआजोच्या जगाला माहित असलेल्या आणि नसलेल्या थोरवीची ओळख मला  मात्र जरा नंतर घडली. थोडा मोठा झाल्यावर मला आईने त्याच्या कर्तृत्वाबद्दल सांगितले... देवल भांड्यांचा कारखाना याची स्थापना पणजीबाई आणि पणजोबांनी जरी केली असली, तरी विश्वासआजोच्या चतुरस्त्रपणामुळे त्या उद्योगाची भरभराट झाली. अमेरिकेतले वैभव सोडून पणजीबाईला दिलेला शब्द पाळायचा म्हणून तो भारतात परतला होता. त्याच्या ओरिगामी सारखीच सुंदर आणि रेखीव कटलरी रेंज त्यानी लौंच केल्यावर कारखान्यात येणारे ग्राहक पुष्कळच वाढले. ‘देवल म्हणजे जणू चांदीच’ हे घोषवाक्य खऱ्या अर्थाने वृद्धिंगत झाले. देवल यांचे डिनर सेट अनेक उच्चभ्रू लोकांच्या घरात पोहोचू लागले.

तो कॉलेजमध्ये असताना त्याने गीतेवरही अभ्यास केला होता, त्याचे ते लेखन वाचण्याचे भाग्य मला काही महिन्यांपूर्वी प्राप्त झाले.

आई मला सांगत असे... ती आणि मा या दोघी त्याच्या डोळ्यातल्या ताईत होत्या. त्यांच्या लहानपणी तो त्यांना रोविंगला, पोहायला, सिनेमा आणि नाटक बघायला घेऊन जायचा. त्यादोघी आणि दोघे मामा यांना झोपायच्या आधी तो ‘बेडटाईम स्टोरी’ ऐकवायचा, ज्याचा सस्पेन्स त्यांना खिळवून ठेवायचा. दूरदर्शनवर त्यावेळी ‘येस मिनिस्टर’ ही ब्रिटीश मालिका लागत असे. तेव्हा अख्या घरात तशी इंग्रजीची चांगली ओळख त्यालाच असल्यामुळे तो ती मालिका बघताना अगदी उत्फुल्लित व्हायचा, आणि आईला त्याचे अत्यंत कौतुक वाटायचे. आई कित्येकदा सांगायची की  तिचा विश्वासकाका जेव्हा नवसह्याद्रीत शिफ्ट झाला, तेव्हा त्या चौघांच्या आठवणीनी ती अक्षरशः रडवेली व्हायची.

असा माझा विश्वासआजो आता पुन्हा कधी न भेटण्यासाठी शिफ्ट झाला आहे. आता त्याला देहरुपात बघणे जरी शक्य नसले, तरी त्यानी माझ्यावर आणि माझ्या आईवर केलेले प्रेम, आमच्यावर घडवलेले संस्कार आणि माझ्या मनातल्या आठवणींचा ठेवा हा कायम माझ्या बरोबर राहील.

No comments:

Post a Comment